Monday, August 13, 2007

गटारी वुईथ पोलिस लाठी....

गटारी अमावस्या म्हटली की तरुणांचा जोश वाढतो. त्यातही ती रविवारी आली म्हटल्यावर सगळेजण ती कशी साजरी करायची याचे प्लॅन करीत असतो. काही जण नशीबवान असतात. ते मोठ्या उत्साहाने गटारी साजरी करीत असतात. आमची गटारीची कहाणी मात्र एकदम वेगळी आणि विशेष लक्षात राहण्यासारखी आहे. ती तुम्ही वाचाच......
काल (रविवार) सगळेजण गटारी साजरी करीत असताना आम्ही दुर्दैवी प्राणी मात्र, कार्यालयात पाने भरायची कामे करीत होतो. त्यातही आमच्यातील काही दुर्दैवी प्राणी गटारीसाठी किती किलो मटण फस्त झाले, किती कोंबड्या शहीद झाल्या, किती बाटल्या फुटल्या याची बातमीदारांनी दिलेल्या बातम्या (लेख?) "एडिट' करण्यात गुंतले होते. (दुर्दैवच त्यांचे ते तरी काय करणार म्हणा!). आम्हीही त्यातलेच. फक्त अशा बातम्या आम्ही सोडलो नाही म्हणून तितके दुर्दैव नाही. तर अशा रीतीने कालची सायंकाळ जात होती. रात्री साठेंचा डबा खात असताना आमचे परममित्र देविदास देशपांडे म्हणाले की, रात्री हैदराबाद बिर्याणी खायला जाऊ यात का? त्याला मी तातडीने संमती दिली. "चला कशी का होईना किमान हैदराबादी संगे गटारी साजरी तरी होईल. पण हाय रे दुर्दैव.....
रात्री लवकर जायचे ठरविले पण काम संपले रात्री साडेअकरा वाजता. आमचे दुसरे परममित्र आशिष यांचे काम रात्री सव्वा बारा वाजता संपले. त्यामुळे आमच्या गटारी गटारीत गेल्यात जमा होती. शेवटी नेहमीच्या ठिकाणी झेड ब्रिज खाली जायचे ठरविले. आम्ही तिघे पोचलो. त्यानंतर दुसरे सहकारी योगिराज, प्रशांत व प्रशांतचा मित्र (?) असे तिघे आले. नेहमीची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. खाणे झाल्यानंतर कॉफी सांगितली. यानंतरच खरी गम्मत सुरू झाली. कॉफीची वाट पाहत बसलो असतानाच माझ्या समोर बसलेले देविदास व आशिष अचानक उठून पळू लागले. मला काहीच समजले नाही. मी आजूबाजूला पाहिले तर सर्वच जण पळत असल्याचे दिसले. मला वाटले काही गडबड झाली की काय? कारण तेथेच काही मुले बहुधा दारू पिऊन आपपसात दंगामस्ती करीत होती. त्यांच्यात काही झाले का असे वाटले. सर्वजण पळाले म्हणून मीही काही न बघता जागेवरून उठलो आणि हेल्मेट व जाकीट खुर्चीवरून उचलले व पळालो. काही अंतरावर गेल्यावर वळू पाहिले तर एक पोलिस काठी घेऊन आम्ही बसलो त्या ठिकाणाच्या सर्वांना हकलत होता. मी, देविदास, आशिष व योगिराज एका बाजूला पळालो. या गडबडीत प्रशांत व त्याचा मित्र (?) कुठे गेले हे समजलेच नाही.
गाड्या ठेवलो होते त्या ठिकाणी आम्ही चौघे जमलो. त्यावेळेस कळाले की, पोलिसांची एक गाडी नेहमीप्रमाणे राऊंडवर आली होती. त्यातील एका फौजदाराने गाडीतून उतरताच काठ्या उगारल्या. त्यामुळे रस्त्याच्या जवळ उभ्या असलेले तीन-चार तरुण (बहुधा दारू पिलेले तेच असावेत, अशी माहिती खडके यांनी दिली.) घाबरून पळाले. त्यांचे बघून इतरही पळाले. त्याचा फायदा घेऊन त्या फौजदाराने बैठकीच्या ठिकाणी कर्तव्यदक्षता (?) दाखविण्यासाठी लोकांना हुसकावून लावू लागला. त्यामुळे गोंधळ उडाला. या गडबडीत अनेकजण पैसे न देताच पळाले. मात्र, आमची कॉफी गेल्याचे दुःख आम्हाला होतेच. यावेळी तेथील दुकानाचे मालक व त्या फौजदारात वादावादी झाली आणि तो फौजदार निघून गेला. आम्ही मात्र नंतर शूर (?) असल्यासारखे त्या विषयावर मते मांडू लागलो. त्यानंतरही खडकेंनी आम्हाला कॉफी दिली आणि आम्ही पैसे देऊन तेथून बाहेर पडलो.अशा रीतीने आमची "गटारी' लक्षात राहण्याजोगी झाली होती. खरे लवकर लिहिण्याच्या नादात व्यवस्थित मनोरंजनात्मक लिहू शकलो नाही, याची जाणीव आहे. मात्र, यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, की नक्की काय गडबड झाली ते. तो एन्जॉय गटारी वुईथ पोलिस लाठी.........

Sunday, July 22, 2007

भावविश्‍व की "सेकंड लाईफ'

सध्या इंटरनेटवरील नेटिझन्सच्या "सेकंड लाईफ' या प्रतिसृष्टीबद्दल खूप बोलले, लिहिले जात आहे. याची तुलना विश्‍वामित्रांनी तयार केलेल्या प्रतिसृष्टीशी, रावणाच्या मायावीनगरीशी तसेच पांडवांच्या मयसभेशी केली जात आहे. त्यामुळे या "तथाकथित' "सेकंड लाईफ'बद्दल सहाजिकच कुतूहल निर्माण झाले. या आभासी जगातील राहणीमान, त्यातील अर्थकारण, जागेसंबंधी, व्यवहारासंबंधी तसेच हे जग कसे झपाट्याने वाढत आहे. त्याबद्दल अनेक जण आपली "तज्ज्ञ' मते व्यक्त करीत आहेत. तेथे घेण्यात येणाऱ्या अवताराबद्दल मोठी वर्णने वर्णिली जात आहेत. जणू काय हे "सेकंड लाईफ' म्हणजे मानवाच्या सध्याच्या जीवनाला (फर्स्ट लाईफ) पर्यायच आहे. मात्र, खरेच असे पर्याय होऊ शकतो का? असा प्रश्‍न मनात निर्माण झाला. त्यातून अनेक प्रश्‍नही निर्माण होत गेले.
"सेकंड लाईफ' या प्रतिसृष्टीत प्रवेश करण्यासाठी "अवतार' घ्यावा लागतो. कोणीही कोणत्याही प्रकारचा "अवतार' या जगात घेवू शकतो. त्याला काही बंधने नाहीत. त्यामुळे येथे साठ वर्षाचा म्हातारा अठरा वर्षाच्या तरुणासारखे रूप घेऊ शकतो. पाहिजे तशी वेशभूषा घेऊ शकतो. थोडक्‍यात म्हणजे आपण वास्तवात ज्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्या सर्व इच्छा या आभासी जगात पूर्ण करू शकतात. त्यामुळेच बहुतेकांचा याकडे ओढा असावा, अशी शक्‍यता वाटते. मात्र, या मुळे माझ्या मनात एक शंका उपस्थित होते. उपलब्ध माहितीनुसार, आपण या सेकंड लाईफ विषयी विचार केला तर यात मानवी भावनांचा तसेच सामाजिक जीवनाचा विचारच केलेला दिसत नाही. फक्त राहणीमान, आर्थिक स्थिती याबद्दल बोलले जाते. मग मानवाच्या भावनांचे काय? या आभासी जगात त्याला काही स्थान आहे की नाही. तेथे स्वच्छंद वागण्यासही मर्याद नाहीत. तेथे आपण कसेही वागू लागलो तर नियंत्रण कसे ठेवणार? जर आभासी जगातील "अवतार' वास्तव जगातही त्या प्रमाणेच वागू लागला तर.........
मानवी मन हे खूप चंचल आहे. अनेक गोष्टी करण्याची मनात इच्छा असते. मात्र काही कारणास्तव या वास्तव जगात त्या पूर्ण करू शकत नाही. त्या अनेक इच्छा मनातल्या मनात दबून जातात. त्यातून जर काही मार्ग निघाला नाही तर अनेकांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. यावर काही जण हे एक वेगळाच मार्ग काढतात. ते म्हणजे, आपल्याला काय करावे वाटते ते आपल्या मनातल्या मनात योजतात. म्हणजेच मनातच आपल्या गोष्टी पूर्ण करीत असतात. उदा. एखाद्या हिंदी चित्रपटातील हिरो सारखे वागता येत नसेल. तर मनातल्या मनात ते आपण हिरो आहोत, अशी कल्पना करतात. त्यामुळे ते आपल्याच "भावविश्‍वा'त रममाण झालेले असतात. त्याला आपण 'हुकलेले' असे म्हणत असतो. पण ते दुसऱ्याच विश्‍वात गेलेले असतात. याला आपण आपल्या जीवनातील "सेकंड लाईफ' का म्हणू शकत नाही. असे अनेक जण आपल्याला सापडतील जे आपल्याच भावविश्‍वात रममाण झालेले आढळतात. अशा काही जणांची अवस्था टोकाला जाऊन वेड लागण्याचीही शक्‍यता असते.
यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, नेटिझन्सच्या या "सेकंड लाईफ'बद्दल भारतातील, महाराष्ट्रातील किती जणांना माहिती आहे. त्यांना त्याबद्दल उत्सुकता आहे. याबद्दल शंकाच आहे. कारण इंटरनेटचा वापर भारतात वाढला तरी तो कोणत्या गोष्टींसाठी वाढत आहे याचाही विचार व्हायला हवा. आज तरुण पिढी इंटरनेट वापरण्यात आघाडीवर आहे. मात्र ते त्याचा वापर बहुतांश वेळा नोकरी शोधणे, चॅटिंग करणे, अश्लील साइट पाहणे, गेम्स आणि काही जण ब्लॉगिंग करणे यासाठी करतात. त्यातील काही टक्के हे माहितीसाठी इंटरनेटचा वापर करतात. साधारणतः काही अपवाद वगळता भारतातील चाळिशीच्या पुढची पिढी ही अजूनही इंटरनेट निरक्षर आहे. त्यामुळे नेटिझन्सच्या "आभासी जगात' तरुणच जास्त प्रमाणात दिसू शकतील. आज स्पर्धेच्या युगात त्यांच्या काही इच्छा अपूर्णच राहिलेल्या असतात. त्या इच्छा या "सेकंड लाईफ'मध्ये पूर्ण करता येतात. मात्र, त्यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. या सर्व प्रश्‍नांचा तसेच चंचल मानवी मनाचा विचारच यात करणार आहोत की नाही. तसे नसेल तर मग आपल्या मनात असणारे भावविश्‍व हेच खरे "सेकंड लाईफ' होय.

Sunday, July 1, 2007

hostel life

एक वर्षापूर्वी माझा लेख `सकाळ्मध्ये आला होता. त्या लेखाची ही प्रत...... तुम्हाला नक्कीच आवडेल.........
--------------
केवळ सोईसाठी "पॅरासाईट'

काय हो, तुम्ही "पॅरासाईट' हा शब्द कधी ऐकला आहे का? पुणे विद्यापीठात शिकलेल्या प्रत्येकाला हा शब्द माहीत असेल. आज राज्याच्या प्रशासनात, केंद्राच्या प्रशासनात मोठ्या पदावर राहिलेल्या अनेक जणांनी "पॅरासाईट' म्हणून पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलवर दिवस काढलेले आहेत. आता विद्यापीठाने हॉस्टेलवरील पॅरासाईटवर कारवाई केल्याने ते दिवस आठवले. तर मी "पॅरासाईट'विषयी सांगत होतो. (होस्टेलमध्ये मित्राच्या रूमवर "चोरी चोरी चुपके चुपके' राहणे म्हणजे पॅरासाईट) तेव्हा, म्हणजे 2001 पूर्वी विद्यापीठाच्या सहाही हॉस्टेलवर मोठ्या प्रमाणात "पॅरासाईट' होते. मीही त्यांच्यापैकीच एक. काही जणांनी तर सहा-सहा, आठ-आठ वर्षे या हॉस्टेलवर "पॅरासाईट' म्हणून दिवस काढलेले आहेत. बहुतेक वेळा ही मुले "एमपीएससी' किंवा "यूपीएससी' करणारी असतात. त्यामुळे या मुलांचे मार्गदर्शन नव्या मुलांना होत असे. काही जण अशा मुलांना आपल्या रूमवर जागा देत असत. रूमचा मालक असलेला विद्यार्थी कॉटवर झोपत असे, तर "पॅरासाईट' हा जमिनीवर अंथरूण टाकून. काही जण मात्र मूळ मालकाला खाली झोपवून आपण त्या रूमचे मालक असल्याप्रमाणे राहत असत, ही गोष्ट वेगळी! "टू सीटेड' रूममध्ये चार ते पाच जण, तर पाच जणांच्या खोलीत किमान दहा ते बारा जण राहत असत. विद्यापीठाच्या हॉस्टेलवर जेवढी मुले कायदेशीर प्रवेश घेऊन राहत होती तेवढीच, किंबहुना जास्तच "पॅरासाईट' म्हणून राहत होती. यातील बहुसंख्य मुले ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी व जयकर ग्रंथालयात बसणारी होती. त्यामुळे परीक्षांच्या काळात "जयकर'मध्ये जागा मिळविणे म्हणजे एक दिव्य असायचे. त्यासाठी सकाळी साडेसहा ते सातपासूनच रांग लावावी लागायची. यात "पॅरासाईट' मुलांचा पुढाकार जास्त होता. एक हेतू म्हणजे जागा मिळविणे आणि दुसरा म्हणजे सकाळी-सकाळी हॉस्टेलवर रेक्‍टरची "धाड' पडली तर आपण सापडले जाऊ नये. त्यामुळे ही मुले सकाळीच "जयकर'ला पळ काढायची. मात्र ती दुपारी काही वेळ आराम करण्यासाठी पुन्हा रूमवर येत असत. रेक्‍टरची धाड पडू नये, आपल्यामुळे ज्याच्या नावावर रूम आहे त्याला त्रास होऊ नये, यासाठी "पॅरासाईट्‌स' दक्ष असायचे. ज्या दिवशी "धाड' पडणार अशी कुणकुण लागायची, तेव्हा ते रूमवर रात्री उशिरा येत असत. कारण रेक्‍टर रात्री साडेअकरा ते दीड या वेळातच धाडी टाकत असत. त्यांचे वेळापत्रक काही विद्यार्थ्यांना पाठ झाले होते. त्यामुळे हे विद्यार्थी सायंकाळपासूनच इतरांना सावध करीत. तसेच एका हॉस्टेलवर धाड पडली की जवळच्या हॉस्टेलवरील मुले "गुल्ल' व्हायची. त्यामुळे बेसावध असलेलेच रेक्‍टरच्या हाती पडत. नवीन होतो तेव्हा एकदा सकाळी आठच्या सुमारास आंघोळीसाठी जात असतानाच सहा नंबर हॉस्टेलवर रेक्‍टरची धाड पडली. त्यामुळे सर्व "पॅरासाईट' बनियन व टॉवेलवर हॉस्टेलमागील झुडपात पळालो. ते दृश्‍य आठवले की अजूनही हसू आवरत नाही. असाच एक दुसरा प्रसंग. एम.ए.च्या दुसऱ्या वर्षाला असताना चार नंबरच्या हॉस्टेलवर राहत होतो. हिवाळ्यात एके दिवशी रात्री अडीचच्या सुमारास रेक्‍टरची धाड पडल्याची कुणकुण लागली. लागलीच आजूबाजूच्या रूममधील "पॅरासाईट'नी थेट गच्चीवर धाव घेतली. कडाक्‍याची थंडी पडलेली. गच्चीवर जाण्यासाठी खिडक्‍यांवरून जावे लागत असे. त्यामुळे प्रत्येकाची वर जाण्याची घाई. वर जाऊन त्या थंडीत उघड्या जमिनीवर झोपलो- जेणेकरून कोणाला दिसू नये. कडाक्‍याच्या थंडीत सुमारे दोन तास सर्वांनी गच्चीवर काढले. अनेकांनी अशा कित्येक रात्री तारे मोजण्यात घालविल्या. "पॅरासाईट' विद्यार्थी रात्री बाराशिवाय झोपत नसत. लवकर झोपले आणि रेक्‍टर आले तर काय घ्या? त्यामुळे रात्री अनेक जण अभ्यास करण्यात अथवा दंगामस्ती, गाणे ऐकणे अशा व्यापत दिसत. प्रत्येक हॉस्टेलवर एक तरी "हौशी' गायक किंवा वादक असे. त्यामुळे त्यांची कला ऐकत, त्यांची टिंगल करण्यात रात्र कशी सरत होती, ते कळतच नव्हते. 2001 नंतर आता वसतिगृहातील वातावरण "स्ट्रिक्‍ट' केले आहे. त्यामुळे "पॅरासाईट' कमी झाले आहेत. विद्यापीठात मुलांसाठी सहा व मुलींसाठी वेगळे हॉस्टेल आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहातही अनेक "पॅरासाईट' राहत असत. एक मात्र खरे, की "पॅरासाईट' हा त्याच्या मर्जीने "पॅरासाईट' होतो असे नाही. नोकरी, घरून येणारे मर्यादित पैसे, आदी प्रश्‍न असल्याने अनेकदा स्वतंत्र खोली घेऊन राहणे शक्‍य नसते. बरे विद्यार्थिदशाही संपलेली असल्याने हॉस्टेलवर प्रवेश मिळत नाही. अशा वेळी सोय लावायची म्हणून परिस्थितीला शरण जाणे, असाच काहीसा हा प्रकार असतो. नाहीतर असे "बांडगूळ' म्हणून जगणे कोणाला आवडते?

- नंदकुमार वाघमारे