गटारी अमावस्या म्हटली की तरुणांचा जोश वाढतो. त्यातही ती रविवारी आली म्हटल्यावर सगळेजण ती कशी साजरी करायची याचे प्लॅन करीत असतो. काही जण नशीबवान असतात. ते मोठ्या उत्साहाने गटारी साजरी करीत असतात. आमची गटारीची कहाणी मात्र एकदम वेगळी आणि विशेष लक्षात राहण्यासारखी आहे. ती तुम्ही वाचाच......
काल (रविवार) सगळेजण गटारी साजरी करीत असताना आम्ही दुर्दैवी प्राणी मात्र, कार्यालयात पाने भरायची कामे करीत होतो. त्यातही आमच्यातील काही दुर्दैवी प्राणी गटारीसाठी किती किलो मटण फस्त झाले, किती कोंबड्या शहीद झाल्या, किती बाटल्या फुटल्या याची बातमीदारांनी दिलेल्या बातम्या (लेख?) "एडिट' करण्यात गुंतले होते. (दुर्दैवच त्यांचे ते तरी काय करणार म्हणा!). आम्हीही त्यातलेच. फक्त अशा बातम्या आम्ही सोडलो नाही म्हणून तितके दुर्दैव नाही. तर अशा रीतीने कालची सायंकाळ जात होती. रात्री साठेंचा डबा खात असताना आमचे परममित्र देविदास देशपांडे म्हणाले की, रात्री हैदराबाद बिर्याणी खायला जाऊ यात का? त्याला मी तातडीने संमती दिली. "चला कशी का होईना किमान हैदराबादी संगे गटारी साजरी तरी होईल. पण हाय रे दुर्दैव.....
रात्री लवकर जायचे ठरविले पण काम संपले रात्री साडेअकरा वाजता. आमचे दुसरे परममित्र आशिष यांचे काम रात्री सव्वा बारा वाजता संपले. त्यामुळे आमच्या गटारी गटारीत गेल्यात जमा होती. शेवटी नेहमीच्या ठिकाणी झेड ब्रिज खाली जायचे ठरविले. आम्ही तिघे पोचलो. त्यानंतर दुसरे सहकारी योगिराज, प्रशांत व प्रशांतचा मित्र (?) असे तिघे आले. नेहमीची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. खाणे झाल्यानंतर कॉफी सांगितली. यानंतरच खरी गम्मत सुरू झाली. कॉफीची वाट पाहत बसलो असतानाच माझ्या समोर बसलेले देविदास व आशिष अचानक उठून पळू लागले. मला काहीच समजले नाही. मी आजूबाजूला पाहिले तर सर्वच जण पळत असल्याचे दिसले. मला वाटले काही गडबड झाली की काय? कारण तेथेच काही मुले बहुधा दारू पिऊन आपपसात दंगामस्ती करीत होती. त्यांच्यात काही झाले का असे वाटले. सर्वजण पळाले म्हणून मीही काही न बघता जागेवरून उठलो आणि हेल्मेट व जाकीट खुर्चीवरून उचलले व पळालो. काही अंतरावर गेल्यावर वळू पाहिले तर एक पोलिस काठी घेऊन आम्ही बसलो त्या ठिकाणाच्या सर्वांना हकलत होता. मी, देविदास, आशिष व योगिराज एका बाजूला पळालो. या गडबडीत प्रशांत व त्याचा मित्र (?) कुठे गेले हे समजलेच नाही.
गाड्या ठेवलो होते त्या ठिकाणी आम्ही चौघे जमलो. त्यावेळेस कळाले की, पोलिसांची एक गाडी नेहमीप्रमाणे राऊंडवर आली होती. त्यातील एका फौजदाराने गाडीतून उतरताच काठ्या उगारल्या. त्यामुळे रस्त्याच्या जवळ उभ्या असलेले तीन-चार तरुण (बहुधा दारू पिलेले तेच असावेत, अशी माहिती खडके यांनी दिली.) घाबरून पळाले. त्यांचे बघून इतरही पळाले. त्याचा फायदा घेऊन त्या फौजदाराने बैठकीच्या ठिकाणी कर्तव्यदक्षता (?) दाखविण्यासाठी लोकांना हुसकावून लावू लागला. त्यामुळे गोंधळ उडाला. या गडबडीत अनेकजण पैसे न देताच पळाले. मात्र, आमची कॉफी गेल्याचे दुःख आम्हाला होतेच. यावेळी तेथील दुकानाचे मालक व त्या फौजदारात वादावादी झाली आणि तो फौजदार निघून गेला. आम्ही मात्र नंतर शूर (?) असल्यासारखे त्या विषयावर मते मांडू लागलो. त्यानंतरही खडकेंनी आम्हाला कॉफी दिली आणि आम्ही पैसे देऊन तेथून बाहेर पडलो.अशा रीतीने आमची "गटारी' लक्षात राहण्याजोगी झाली होती. खरे लवकर लिहिण्याच्या नादात व्यवस्थित मनोरंजनात्मक लिहू शकलो नाही, याची जाणीव आहे. मात्र, यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, की नक्की काय गडबड झाली ते. तो एन्जॉय गटारी वुईथ पोलिस लाठी.........