Friday, November 11, 2011

'टेक सॅटर्डे'

माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या महान्यूज या वेबपोर्टलवर मी दि. 5 नोव्हेंबर 2011 रोजी फर्स्ट पर्सन या सदरात एक लेख लिहिला होता. तो लेख येथे देत आहे.
-------------------


संगणकाच्या पडद्यावर आपले 'अवतार' निर्माण करून त्याच्या माध्यमातून आपण ॲडव्हेंचर गेम खेळायचा..., वर्ड अथवा एक्सेल फॉर्मेटमध्ये वेगवेगळ्या करामती कशा करायच्या..., कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपल्या सहकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करायचंय.. गोष्टीरुपी मनोरंजनाच्या मार्गाने संगणक शिकण्याची माहिती घ्यायचीयं... चला तर मग 'टेक सॅटर्डे'ला... होय माहिती तंत्रज्ञानातील नवनवीन माहिती घेऊन आलाय 'टेक सॅटर्डे'...

मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन कामात प्रभावीपणे करण्याची आवड निर्माण व्हावी, या क्षेत्रातील नवनवीन उपकरणांची, तंत्रज्ञानाची माहिती त्यांना व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग सचिवालय जिमखाना यांनी हा 'टेक सॅटर्डे' आयोजित केला होता. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा First saturday tech saturday campaign अंतर्गत हा 'टेक सॅटर्डे' साजरा करण्यात येणार आहे. खरे तर मंत्रालयाच्या गेटवर गेल्या दोन दिवसांपासून या 'टेक सॅटर्डे' चा बोर्ड लक्ष वेधू घेत होता. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली होती की, काय आहे हा 'टेक सॅटर्डे'. नेहमीप्रमाणे कुठल्या तरी दिवसा सारखा तर हा 'टेक सॅटर्डे' तर नसेल, असे अनेक प्रश्न मनात होते. त्यामुळे मी कामावर आल्यावर लगेच सचिवालय जिमखान्याच्या दिशेने गेलो. जिमखान्याच्या सभागृहात प्रवेश केला अन् एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखे झाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल लागले होते.

प्रवेश केल्यावर समोरच 'कंम्प्युटर मस्ती' चा स्टॉल होता. तिकडे गेलो. सहज सोप्या गोष्टी रुपात लहान मुलांनाही समजेल अशा रितीने संगणक कसा शिकायचा, याची माहिती या ठिकाणी देण्यात येत होती. इनओपन टेक्नॉलॉजीज 'आयआयटी' मुंबई यांचा हा उपक्रम आहे. शाळांमधून संगणकाचे शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये झालेल्या संशोधनावर आधारित हा 'कंम्प्युटर मस्ती' उपक्रम आहे. पाठ्यपुस्तकांबरोबरच ॲनिमेशन, गेम्स आणि इंटरॲटिव्ह मिडीयामधून संगणक शिक्षण दिले जाते. ही सर्व माहिती मला नवीनच होती. त्यामुळे माझ्या ज्ञानात भरच पडली.

नॅसकॉमतर्फेही वर्ड, एक्सेल यामध्ये कसे काम करायचे. वर्ड २००७ची वैशिष्ट्ये आदी विषयीही माहिती दिली. त्यांचा एक मदतनीस शेजारच्या लॅपटॉपवर नेहमी काम करणाऱ्या वर्ड, एक्सेल मधील नवनवीन माहितीचा वापर कसा करायचा हे सांगत होता. नेहमी वर्ड, एक्सेलमध्ये काम करत असूनही अनेक गोष्टी नवीन होत्या. त्यामुळे येथे आल्याचा मला फायदाच झाला.

त्याच्या शेजारीच संगणकावर एक भन्नाट खेळ सुरू होता. आतापर्यंत आपण फक्त संगणकावरच्या व्हिडीओ गेमवर बटणाच्या सहाय्याने खेळ खेळत होतो. पण येथे आपण स्वतःचा एक 'अवतार' या संगणकावर निर्माण करून त्याला आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे खेळायला लावू शकत होतो. एका मोठ्या एलसीडी स्क्रिनच्या समोर आपण स्वत: उभारून हा ॲडव्हेंचर गेम खेळायचा. यात आपण जागेवर उभारून जशी हालचाल करू तशीच हालचाल संगणकावरील आपला हा 'अवतार' करायचा. अतिशय मजेशीर असा हा गेम होता. संगणकाने किती क्रांती केली आहे, याचे हे एक छोटेसे उदाहरण होते.

शासकीय कार्यालयामध्ये अनेक बैठका होतात. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक अधिकारी/कर्मचारी येत असतात. त्यांना त्यासाठी प्रवासाची दगदग करावी लागते. ही दगदग होऊ नये, सामान्य जनतेची कामे खोळंबू नयेत, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय समोर आला आहे. हे व्हिडिओ कॉन्फरसिंग कसे चालते. त्यामागची टेक्नॉलॉजी काय आहे, याचाही माहिती येथील एका स्टॉलवर मिळत होती. ग्रुप -मेल, ग्रुप कॉन्फरन्सिंग, तसेच इतर तंत्रज्ञानाविषयीही माहिती यावेळी मिळाली. मनात आले की, जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली तर कितीतरी कामे कमी खर्चात जनतेची कोणतीही गैरसोय होता होईल. या तंत्रज्ञानामुळे पैसा वेळ दोन्हीही वाचेल, यात शंका नाही. महाराष्ट्र शासनाने यासाठीही पाऊल उचलल्याचीही माहिती यावेळी मिळाली.

या अनमोल माहितीबरोबरच कार्यालयात नेहमी वापरणाऱ्या प्रिंटर, फॅक्स, स्कॅनर या साहित्याच्या उत्पादनात किती बदल झाले आहेत, याची माहितीही मिळत होती. 'एचपी' या कंपनीने प्रिंटर, कॉम्पॅक्ट स्कॅनर, कुठेही नेता येणारे बॅटरीवर चालणारे फॅक्स झेरॉक्स मशीन याची माहिती डेमोसह येथे दिली होती. प्रिंटरवर तर तुम्ही मोबाईलवर आपला फोटो काढून अथवा मोबाईवरील एखादे डॉक्युमेंट थेट मेल केल्यावर तुमचा फोटो किंवा डॉक्युमेंट प्रिंट होतो. मीही मोबाईल वर माझा एक फोटो काढून प्रिंटरकडे पाठविला तर लगेच त्याची प्रिंट आली. तंत्रज्ञान किती वेगाने पुढे गेले आहे, याचा हा साक्षात नमुनाच होता. अनेक शासकीय कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले असल्यास नवल नाही.

संगणक पर्यायाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या काय लेटेस्ट आहे... कोणती नवनवीन तंत्रे आली आहेत.., नवनवीन सॉफ्टवेअर काय आहेत... याची संपूर्ण माहितीच या 'टेक सॅटर्डे' मधून मला समजली. महाराष्ट्र शासन -गर्व्हनन्सच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मंत्रालयात अथवा शासकीय कार्यालयात आता सगळी कामे संगणकावर होत आहेत. तरीही अनेकजण संगणकावर काम करायला बिचकतात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्याच पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरूवात आजपासून झाली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंत्रालयाबरोबरच जिल्हास्तरावरही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मला मिळाली. खरंच अशा उपक्रमाची गरज होती, असं मला मनातून वाटतं होत. संगणकावर काम करणाऱ्यांसाठी तर हे 'टेक सॅटर्डे' उपयुक्त आहेच.. त्याशिवाय जिज्ञासूंनी देखील 'टेक सॅटर्डे'ला हजेरी लावायला हरकत नाही. नवनवीन ज्ञानाबरोबरच आपल्याला असलेल्या ज्ञानातून बक्षिसही या उपक्रमात मिळवता येणार आहे. चला तर मग 'टेक सॅटर्डे'मध्ये सहभागी व्हायला.. अं हं.. आता वेळ संपली... आता प्रतिक्षा करा पुढच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारची... तर मग भेट देणार ना 'टेक सॅटर्डे'ला....

 • नंदकुमार वाघमारे
 • Tuesday, January 11, 2011

  अन् मुख्यमंत्री आले रांगेतील जनतेपर्यंत

  मंगळवारच्या संध्याकाळी पावणे सातची वेळ… स्थळ मंत्रालयातील मिनी थिएटर.. हॉलमध्ये तसेच हॉलच्या बाहेर रांगेत उभी असलेली राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेली जनता.. मुख्यंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडायला मिळेल की नाही.. याची त्यांच्या चेहऱ्यावर चिंता… हॉलमधील अभ्यागतांची भेट झाल्यावर मुख्यमंत्री थेट हॉलच्या बाहेर येऊन रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाकडून निवेदन स्विकारण्यास सुरूवातही केली.. मंत्रालयातील कर्मचारी… सुरक्षा विभागातील पोलीस… अन् रांगेतील जनता यांनाही हे काय सुरू आहे हे क्षणभर उमगलेच नाही…
  राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुद्द मंत्रालयातील तळमजल्याच्या लॉबीत उभे राहून रांगेतील प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे निवेदन स्विकारतानाचे हे चित्र आज खूप जणांनी पाहिले. माझ्या कार्यालयाच्या दरवाज्यासमोरच खुद्द मुख्यमंत्री निवेदन घेताना मीही पाहिले अन् मनोमन वाटले 'हे पाणी काही औरच आहे…'

  राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला भेटण्यासाठी गेल्या दोन-तीन आठवड्यापासून दर मंगळवारची वेळ ठेवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला थेट भेटण्याची संधी मिळते. आजही मंगळवार असल्यामुळे दुपारी चारपासूनच माझ्या कार्यालयासमोरच असलेल्या मिनि थिएटरमध्ये राज्यातील दूरदूरहून आलेले लोक जमा होत होते. मला आपलं हे आता नेहमीचचं असल्यामुळे मी काय किंवा मंत्रालयातील इतर कर्मचाऱ्यांनी जास्त लक्ष दिले नाही. काही वेळानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हॉलमध्ये आले अन् जनता दरबार सुरू झाला.
  सायंकाळचे सहा वाजल्यानंतरही गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सचिव काय करायचे याचा विचार करीत होते. बाहेर रांगेत उभ्या असणाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, आज काही मुख्यमंत्री आपल्याला भेटणार नाहीत… त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी झळकली…
  पण तेवढ्यात खुद्द मुख्यमंत्री हॉलबाहेर आले अन् रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडून निवेदने स्विकारू लागले.. आमच्या कार्यालयासमोरच हे सर्व सुरू झाल्याने आमचे सहकारी हा नजारा पाहण्यासाठी बाहेर आहे. रांगेतील लोकही आश्चर्य चकित झाले. मुख्यमंत्र्यांना आपली तक्रार सांगण्यास सगळेच उत्सुक होते. प्रत्येकाची तक्रार थोडक्या ऐकून त्यांचे निवेदन घेऊन स्वतः मुख्यमंत्री त्यांना पुढे पाठवित होते. काही वेळानंतर सगळ्यांची निवेदने घेऊन ते पुन्हा सहाव्या मजल्याकडे निघाले. जातानाही ते लोकांबरोबर बोलत निघाले होते. या सर्व धावपळीत त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीसांची थोडी धावपळ झाली..  मुख्यमंत्री लिफ्टने सहाव्या मजल्यावर गेल्यानंतर मात्र, या नव्या मुख्यमंत्र्यांची ही नवी स्टाईल सगळ्यांना आवडल्याची चर्चा सुरू झाली. मग मीही ही घटना सगळ्यांना कळावी म्हणून हा ब्लॉग लगेच लिहण्यास सुरू केला…  मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे कितीतरी नवीन गोष्टी करीत आहेत. एक वेगळा संदेश जनतेला त्यांच्या कृतीतून देत आहेत. आजची ही घटनाही हेच सांगणारी होती….  Monday, December 13, 2010

  नागपूरची थंडी

  नागपूरचे हिवाळी अधिवेशन आणि थंडी हे समीकरण आतापर्यंत झाले होते. अधिवेशनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांचे या संत्रा नगरीत स्वागत हे थंडीनेच होत असे. माझ्यासारख्या मुंबईहून आलेल्यांचेही नागपूरनगरीत रेल्वेस्थानकावर उतरल्या उतरल्या थंडीनेच स्वागत होत असे. यंदा मात्र, या थंडीचे

  आगमन आमच्या नंतर झाले. सुरवातीला काहीच थंडी नव्हती. मात्र, आता अधिवेशन संपण्यास आल्यानंतर थंडी वाढू

  लागली आहे. गेल्या आठवडय़ात थंडीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र, दोन दिवसानंतर परत थंडी गायब झाली. त्यामुळे यंदा अधिवेशनात थंडी अनुभवायला मिळते की नाही, असे वाटत होत. पण कालपासून पुन्हा गारठा जाणवू लागला आहे.

  नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी बाहेरगावाहून आलेले पाहुणे येथे थंडी असते म्हणून जय्यत तयारीने येथे येतात. स्वेटर, शाल, जर्किन यासारखे गरम कपडे आणतात. अधिवेशन डिसेंबरला सुरू झाले. तत्पूर्वी २९ ३० नोव्हेंबरला सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचे नागपूरमध्ये आगमन झाले होते. मीही थंडीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. जेव्हा नागपूरमध्ये आलो तर येथे त्यावेळेपर्यंत काहीच थंडी पडली नव्हती. माझ्यासारखेच इतर लोकही थंडी पडली नसल्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. अधिवेशन सुरू झाल्यानंतर तीन-चार दिवस काहीच थंडी जाणवत नव्हती. त्यामुळे यंदा नागपूरची थंडी अनुभवायला मिळणार नाही, असे वाटत होते.

  मात्र, गेल्या शनिवारी थोडी थंडी जाणवू लागली... रविवारी सायंकाळी आम्ही सुट्टी असल्यामुळे फिरायला पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी गेलो होते. तेथे मात्र थंडी जाणवू लागली होती. जेव्हा रात्री परत नागपूर शहरात आलो तेव्हा मात्र बर्‍याच प्रमाणात थंडी जाणवू लागली होती. त्यानंतर बॅगेत असलेले स्वेटर, जर्किन, शाल आदी गरम कपडे बॅगेच्या बाहेर काढले. पहिले दोन-तीन दिवस थंडी नाही, म्हणून आमच्या १६० या निवासस्थानी गटा गटाने चर्चा सुरू असायच्या. आता मात्र, थंडीच्याच गप्पा सुरू असतात. सायंकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे थंडीची जाणीवही लवकर होऊ लागली आहे. मात्र, गेल्या आठवडय़ात परत गारठा गायब झाला होता.

  पण आता खरा गारठा जाणवू लागल्यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आल्यासारखे वाटू लागले होते. कारण विधीमंडळ परिसरात स्वेटर, कोट, शाल आदी गरम कपडे घालून फिरणारे अभ्यागत दिसत होते. आज सकाळी आल्या आल्या सहज विधीमंडळ परिसरात चक्कर टाकली तर बहुतेक सर्वजण गरम कपडे घालून आलेले दिसत होते.

  गेल्या आठवडय़ात गायब झालेली थंडी आता पुन्हा येत आहे. कालपासूनच थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे पावसाप्रमाणेच थंडीचाही कहर होईल का... किती दिवस थंडी राहिल... अशा एक ना अनेक प्रश्नांवर नागपूरमध्ये आलेल्या पाहुण्यांची चर्चा सुरू झाली.

  खरे तर नागपूर अधिवेशन संपण्यास आता दोनच दिवस उरले आहेत. गेले तेरा चौदा दिवस थंडी नसल्यामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर ठिकाणाहून आलेले पाहुणे निश्चिंत होते. मात्र, शेवटच्या दिवसात गारठा जास्तच जाणवत आहे. आज तर साडे अकरा अंशाच्या आसपास तापमान नागपूरमध्ये आहे. त्यामुळे आता खरी थंडीची मजा येत आहे. मात्र दोनच दिवस ती अनुभवयास मिळत असल्यामुळे थोडी हुरहुर वाटत आहे.. कारण नागपूरच्या थंडीची मजा काही औरच असते हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेस अनुभवाय मिळाले होते.

  आता मुंबईहून आलेले अधिकारी, कर्मचार्‍यांची ओढ घराकडे लागली आहे. दोन दिवस आता खरेदी, पॉकिंग यामध्ये कसे निघून जातील कळणार नाही. त्यामुळे नागपूरची थंडी त्यांना जाणवणार नाही.. एवढे मात्र, नक्की...