Monday, December 13, 2010

नागपूरची थंडी

नागपूरचे हिवाळी अधिवेशन आणि थंडी हे समीकरण आतापर्यंत झाले होते. अधिवेशनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांचे या संत्रा नगरीत स्वागत हे थंडीनेच होत असे. माझ्यासारख्या मुंबईहून आलेल्यांचेही नागपूरनगरीत रेल्वेस्थानकावर उतरल्या उतरल्या थंडीनेच स्वागत होत असे. यंदा मात्र, या थंडीचे

आगमन आमच्या नंतर झाले. सुरवातीला काहीच थंडी नव्हती. मात्र, आता अधिवेशन संपण्यास आल्यानंतर थंडी वाढू

लागली आहे. गेल्या आठवडय़ात थंडीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र, दोन दिवसानंतर परत थंडी गायब झाली. त्यामुळे यंदा अधिवेशनात थंडी अनुभवायला मिळते की नाही, असे वाटत होत. पण कालपासून पुन्हा गारठा जाणवू लागला आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी बाहेरगावाहून आलेले पाहुणे येथे थंडी असते म्हणून जय्यत तयारीने येथे येतात. स्वेटर, शाल, जर्किन यासारखे गरम कपडे आणतात. अधिवेशन डिसेंबरला सुरू झाले. तत्पूर्वी २९ ३० नोव्हेंबरला सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचे नागपूरमध्ये आगमन झाले होते. मीही थंडीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. जेव्हा नागपूरमध्ये आलो तर येथे त्यावेळेपर्यंत काहीच थंडी पडली नव्हती. माझ्यासारखेच इतर लोकही थंडी पडली नसल्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. अधिवेशन सुरू झाल्यानंतर तीन-चार दिवस काहीच थंडी जाणवत नव्हती. त्यामुळे यंदा नागपूरची थंडी अनुभवायला मिळणार नाही, असे वाटत होते.

मात्र, गेल्या शनिवारी थोडी थंडी जाणवू लागली... रविवारी सायंकाळी आम्ही सुट्टी असल्यामुळे फिरायला पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी गेलो होते. तेथे मात्र थंडी जाणवू लागली होती. जेव्हा रात्री परत नागपूर शहरात आलो तेव्हा मात्र बर्‍याच प्रमाणात थंडी जाणवू लागली होती. त्यानंतर बॅगेत असलेले स्वेटर, जर्किन, शाल आदी गरम कपडे बॅगेच्या बाहेर काढले. पहिले दोन-तीन दिवस थंडी नाही, म्हणून आमच्या १६० या निवासस्थानी गटा गटाने चर्चा सुरू असायच्या. आता मात्र, थंडीच्याच गप्पा सुरू असतात. सायंकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे थंडीची जाणीवही लवकर होऊ लागली आहे. मात्र, गेल्या आठवडय़ात परत गारठा गायब झाला होता.

पण आता खरा गारठा जाणवू लागल्यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आल्यासारखे वाटू लागले होते. कारण विधीमंडळ परिसरात स्वेटर, कोट, शाल आदी गरम कपडे घालून फिरणारे अभ्यागत दिसत होते. आज सकाळी आल्या आल्या सहज विधीमंडळ परिसरात चक्कर टाकली तर बहुतेक सर्वजण गरम कपडे घालून आलेले दिसत होते.

गेल्या आठवडय़ात गायब झालेली थंडी आता पुन्हा येत आहे. कालपासूनच थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे पावसाप्रमाणेच थंडीचाही कहर होईल का... किती दिवस थंडी राहिल... अशा एक ना अनेक प्रश्नांवर नागपूरमध्ये आलेल्या पाहुण्यांची चर्चा सुरू झाली.

खरे तर नागपूर अधिवेशन संपण्यास आता दोनच दिवस उरले आहेत. गेले तेरा चौदा दिवस थंडी नसल्यामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर ठिकाणाहून आलेले पाहुणे निश्चिंत होते. मात्र, शेवटच्या दिवसात गारठा जास्तच जाणवत आहे. आज तर साडे अकरा अंशाच्या आसपास तापमान नागपूरमध्ये आहे. त्यामुळे आता खरी थंडीची मजा येत आहे. मात्र दोनच दिवस ती अनुभवयास मिळत असल्यामुळे थोडी हुरहुर वाटत आहे.. कारण नागपूरच्या थंडीची मजा काही औरच असते हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेस अनुभवाय मिळाले होते.

आता मुंबईहून आलेले अधिकारी, कर्मचार्‍यांची ओढ घराकडे लागली आहे. दोन दिवस आता खरेदी, पॉकिंग यामध्ये कसे निघून जातील कळणार नाही. त्यामुळे नागपूरची थंडी त्यांना जाणवणार नाही.. एवढे मात्र, नक्की...


1 comment:

Anonymous said...

Nandu, Thandi pasun bachav karnyachi tayari keli hotis ki nai? Tula ata savaya zali asli pahije, thandi kashi ghalvayachi te?