Tuesday, January 11, 2011

अन् मुख्यमंत्री आले रांगेतील जनतेपर्यंत

मंगळवारच्या संध्याकाळी पावणे सातची वेळ… स्थळ मंत्रालयातील मिनी थिएटर.. हॉलमध्ये तसेच हॉलच्या बाहेर रांगेत उभी असलेली राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेली जनता.. मुख्यंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडायला मिळेल की नाही.. याची त्यांच्या चेहऱ्यावर चिंता… हॉलमधील अभ्यागतांची भेट झाल्यावर मुख्यमंत्री थेट हॉलच्या बाहेर येऊन रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाकडून निवेदन स्विकारण्यास सुरूवातही केली.. मंत्रालयातील कर्मचारी… सुरक्षा विभागातील पोलीस… अन् रांगेतील जनता यांनाही हे काय सुरू आहे हे क्षणभर उमगलेच नाही…
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुद्द मंत्रालयातील तळमजल्याच्या लॉबीत उभे राहून रांगेतील प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे निवेदन स्विकारतानाचे हे चित्र आज खूप जणांनी पाहिले. माझ्या कार्यालयाच्या दरवाज्यासमोरच खुद्द मुख्यमंत्री निवेदन घेताना मीही पाहिले अन् मनोमन वाटले 'हे पाणी काही औरच आहे…'

राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला भेटण्यासाठी गेल्या दोन-तीन आठवड्यापासून दर मंगळवारची वेळ ठेवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला थेट भेटण्याची संधी मिळते. आजही मंगळवार असल्यामुळे दुपारी चारपासूनच माझ्या कार्यालयासमोरच असलेल्या मिनि थिएटरमध्ये राज्यातील दूरदूरहून आलेले लोक जमा होत होते. मला आपलं हे आता नेहमीचचं असल्यामुळे मी काय किंवा मंत्रालयातील इतर कर्मचाऱ्यांनी जास्त लक्ष दिले नाही. काही वेळानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हॉलमध्ये आले अन् जनता दरबार सुरू झाला.
सायंकाळचे सहा वाजल्यानंतरही गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सचिव काय करायचे याचा विचार करीत होते. बाहेर रांगेत उभ्या असणाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, आज काही मुख्यमंत्री आपल्याला भेटणार नाहीत… त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी झळकली…
पण तेवढ्यात खुद्द मुख्यमंत्री हॉलबाहेर आले अन् रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडून निवेदने स्विकारू लागले.. आमच्या कार्यालयासमोरच हे सर्व सुरू झाल्याने आमचे सहकारी हा नजारा पाहण्यासाठी बाहेर आहे. रांगेतील लोकही आश्चर्य चकित झाले. मुख्यमंत्र्यांना आपली तक्रार सांगण्यास सगळेच उत्सुक होते. प्रत्येकाची तक्रार थोडक्या ऐकून त्यांचे निवेदन घेऊन स्वतः मुख्यमंत्री त्यांना पुढे पाठवित होते. काही वेळानंतर सगळ्यांची निवेदने घेऊन ते पुन्हा सहाव्या मजल्याकडे निघाले. जातानाही ते लोकांबरोबर बोलत निघाले होते. या सर्व धावपळीत त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीसांची थोडी धावपळ झाली..मुख्यमंत्री लिफ्टने सहाव्या मजल्यावर गेल्यानंतर मात्र, या नव्या मुख्यमंत्र्यांची ही नवी स्टाईल सगळ्यांना आवडल्याची चर्चा सुरू झाली. मग मीही ही घटना सगळ्यांना कळावी म्हणून हा ब्लॉग लगेच लिहण्यास सुरू केला…मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे कितीतरी नवीन गोष्टी करीत आहेत. एक वेगळा संदेश जनतेला त्यांच्या कृतीतून देत आहेत. आजची ही घटनाही हेच सांगणारी होती….1 comment:

Manish S Patel said...

I don't know why this people always show they are doing something new! is it really useful to conman man. Others Government Servant not working properly that's why people come to CM. Why not CM meet that G.S. and tell them work properly......