Sunday, June 8, 2008

"मराठीचा विजय असो'

मित्रानो, शीर्षक वाचून आश्‍चर्य वाटेल किंवा हा का नवीन बोलतोय असे वाटले. किंवा राज ठाकरे समर्थक समजाल. (तसे काही बाबतीत राज ठाकरे यांचे विचार पटतात म्हणा). मात्र सर्व मराठी लोकांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. ही घटना म्हणजे मराठी पाऊल पुढे पडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानावे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल 73 मराठी मुले यशस्वी झाली आहेत. त्यातील 50 हून जास्त मुलांनी मराठीमधून परीक्षा देवून यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या मराठी वीरांचे यश उल्लेखनीय आहे. म्हणून त्यांचे अभिनंदन करावे थोडेच आहे. भारतीय प्रशासनात आतापर्यंत बिहारी, उत्तरप्रदेशीय अथवा दक्षिणेतील नावे जास्त प्रमाणात दिसत होती. मात्र, ही परिस्थिती बदलण्यास आता सुरवात झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. प्रशासनाच्या या "स्टील फ्रेम'मध्ये जाणारे हे मराठी अधिकारी आपला ठसा नक्कीच उमटवतील यात शंका नाही. ("स्टील फ्रेम' हे पुण्याच्या युनिक ऍकॅडमी प्रकाशित फारुक नाईकवाडी यांचे अतिशय सुंदर व वाचनीय पुस्तक आहे. त्याबद्दल मी नंतर लिहिणार आहेच. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या तसेच मराठीबद्दल न्यूनगंड बाळगणाऱ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावेच)
"स्टील फ्रेम'मध्ये मराठी टक्का
गेल्या काही वर्षात या "स्टील फ्रेम'मध्ये टक्का वाढतो आहे. "यूपीएसएसी'च्या निकालात आतापर्यंत उत्तरेतील अथवा दक्षिणेतील लोकांचे प्राबल्य दिसून येत होते. उत्तर भारतातील विशेषतः बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातील उमेदवार जास्त प्रमाणात यश मिळवत होते. आता महाराष्ट्रही त्या दिशेने वाटचाल करीत आहेत. "महाराष्ट्राचा बिहार होतोय', असे या बाबतीत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, या निकालाकडे पाहिले असता महाराष्ट्राचा "यूपीएससी'मधील यश हे दहा टक्‍क्‍याच्या आसपास आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील 30 ते 35 विद्यार्थीच या परीक्षेत यश मिळवित होते. (राज्यातील गेल्या वर्षी 39 व 1997मध्ये 36 विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामानाने यंदाचे यश उल्लेखनीय म्हणावे लागेल. मात्र एकूण पदाच्या संख्येत ही संख्या दहा टक्केच आहे. ती आता आपल्याला मोडीत काढायची आहे. ती निघेल असा आशावाद बाळगायला हरकत नाही.) त्यातही प्रशासनातील महत्त्वाचे व उच्च पद म्हणजे "आयएएस' होणाऱ्यांचे प्रमाण त्या मानाने कमी होते. या मागील मुख्य कारण म्हणजे इंग्रजीचा धसका व या परीक्षेसंदर्भातील गैरसमज हे होय. मात्र, ही परीक्षा मराठीतून देता येते व त्यात यशही मिळविता येते हे पहिल्यांदा भूषण गगराणी यांनी दाखवून दिले. त्यानंतर मराठीतून परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात यशही येत असल्याचे यंदाच्या निकालावरून दिसत आहे. कष्टाची तयारी, अचूक अभ्यास व "द युनिक ऍकॅडमी', ज्ञानप्रबोधिनी, मुंबईची "एसआयसीएस' सारख्या संस्थांचे मार्गदर्शन यामुळे राज्याला यंदा हे यश दिसून येत आहे.


"खेड्याचा येडा झाला साहेब'
यंदाच्या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी झालेल्यांमध्ये सर्वात जास्त तरुण हे खेड्यातून आलेले आहेत. अतिशय कठीण परिस्थितीतून तसेच कोणतेही साधने नसताना त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहेच त्याबरोबरच इतर तरुणांना आदर्शवत आहे. खरे तर याची सुरवात काही वर्षांपूर्वीपासून सुरू झाली आहे. आयकर उपायुक्त अभिनव कुंभार, "आयपीएस' अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील, यंदाच्या परीक्षेतील सज्जनसिंग चव्हाण, विक्रम खलाटे आदींसारखे तरुण हे खेड्यातूनच प्रशासकीय सेवेत आले आहेत. त्यामुळे गांधीजींनी सांगितलेला "खेड्याकडे चला' हा मंत्र एका अर्थाने सध्या सत्यात उतरतो आहे. ज्या ठिकाणी अजूनही साधी एसटी पोचत नाही, अशा गावातील तरुण "यूपीएससी'मध्ये उल्लेखनीय यश मिळवित आहेत. या सर्व गोष्टी पाहता महाराष्ट्रातील तरुण आता दिल्ली काबीज करण्याच्या दिशेने जात आहेत, असेच चित्र सध्या तरी दिसते आहे. सध्या सर्वच क्षेत्रात मराठी तरुणांनी आपले स्थान बळकट केले आहे. मात्र अजूनही आयएसएस, आयपीएस सारख्या मानाच्या व आव्हानात्मक क्षेत्राकडे अजूनही मराठी तरुण कमी प्रमाणात आकर्षिला जात आहे. यूपीएससी परीक्षेतील महाराष्ट्राचे स्थान दहा टक्‍क्‍याच्या पुढे न्यायचे असेल तर तरुणांनी योग्य मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी करायला हवी, तरच मराठी भाषेचा विजय होईल.


(अधिक माहितीसाठी फारुक नाइकवडे यांचा 24 मे2008 च्या व तुकाराम जाधव यांचा 23 मे 2008च्या दैनिक "लोकसत्ता'मधील लेख आवर्जून वाचावे.)