Monday, December 6, 2010

अखेर 'तो' दिसलाच नाही...

( मित्रानो अनेक दिवसानंतर मी पुन्हा आता ब्लॉग लिहित हे. यापुढेही नियमित लिहण्याचा माझा प्रयत्न राहिल... नागपूरमधील अनुभव लिहिण्याचा आता मानस आहे. आशा आहे की माझ्या या प्रयत्नाला आपल्याकडून प्रतिसाद मिळेल...)


सुमारे एक तास रांगेत उभे राहिलो.. नंतर अडीच तास त्याच्या दर्शनासाठी भटकंती... वारंवार त्याच्या आगमनाची सूचना... कधी या रस्त्यावर तर कधी त्या रस्त्यावर 'तो' दिसेल अशी आशा... 'त्याच्या' एका झलकसाठी सुमारे 65 गाड्यांचा ताफा.... 'त्याच्या' इतर सहयोगींचे मात्र दर्शन
घडले... अडीच तासांच्या प्रतिक्षेनंतरही 'त्याचे' दर्शन काही घडलेच नाही...

अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश विदे शातील पाहुणेही 'त्याची' भेट घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र शेवटपर्यंत त्याचे दर्शन काही घडले नाही. सर्वजण निराश होऊन परत गेले.

हे सर्व ज्याच्या साठी घडले तो म्हणजे जंगलातील राजा वाघ होय... पेंच प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मनात आलेल्या या भावना....
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मी सध्या नागपूर मुक्कामी आहे. परवा रविवारी सुट्टी असल्यामुळे काय करायचे असा विचार आमच्या सहकाऱ्यांचा सुरू होता. कुठेतरी फिरायला जावे असे शुक्रवारपासून आमचे ठरत होते. मात्र कुठे जायचे हे नक्की होत नव्हते. माझे सहकारी इर्शाद बागवान, राजू धोत्रे, किरण केंद्रे, फारूख बागवान, गजानन कोटुरवार ही मंडळी आमच्या टीममध्ये होती. पहिल्यांदा असे ठरले की रविवार सोमवार असे दोन दिवस फिरायला जायचे. मात्र सोमवारी विधानसभेचे कामकाज बंद असले तरी आमचे शिबिर कार्यालय सुरू राहणार होते. त्यामुळे हा बेत रद्द झाला.

त्यानंतर शनिवारी संध्याकाळ पर्यंत आमचे काहीच ठरत नव्हते. त्यात आणखीन म्हणजे किरण फारूख यांना आमच्या बरोबरच येता येणार नव्हते. त्यामुळे आता आम्ही चौघेच उरलो... मग काय चौघांनी ठरविले की जवळच्या ठिकाणी फिरायला जाऊ.. शनिवारी रात्री ठरविले की नागपूरपासून 80 किलोमीटरवर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. तेथे जायचे. त्यानंतर सुरू झाली वाहनाची व्यवस्था करायचे काम.

रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कसे जायचे, हे ठरत नव्हते. त्यामुळे सर्वकाही अधांतरीच होते. गजाजन हा यवतमाळचा म्हणजे विदर्भातला असल्यामुळे त्याला वाहनाची व्यवस्था करायला सांगितले होते. मात्र त्याने ते काम केले नाही. त्यामुळे आम्ही त्याला उचकावलो की, तू खरा विदर्भातला नाही. एक व्यवस्थाही करू शकत नाही... वगैरे वगैरे.. मग काय त्यानेही लगेच खवळून कशीतरी खटपट करून एक इंडिका गाडी मिळविली. तोपर्यंत सकाळचे दहा वाजले होते.... आम्ही ज्यांची गाडी ठरविली त्यांनी सांगितले की, पेंच प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील भागात जाता
ध्यप्रदेशातील कर्माझरी येथून जावा. तेथून तुम्हाला चांगली सोय होईल...सकाळी साडेदहा वाजता आम्ही आमच्या निवासस्थानापासून म्हणजे 160 गाळे येथून पेंचच्या दिशेने प्रयाण केले. नागपूरमधून कामठी रोडने आम्ही कर्माझरीच्या दिशेने प्रयाण केले. नागपूरचे वैशिष्ट्य
म्हणजे मोठे रस्ते... मुंबईच्या तुलनेत येथे वाहतूक कमी
सली तरी येथील मोठ्या रस्त्यांमुळे वर्दळ जास्त जाणवत नाही. त्यामुळे आम्ही काही मिनिटांतच नागपूर शहरातून बाहेर पडलो...

कामठी रोडने आम्ही निघालो ते थेट मनसर गावाजवळ असलेल्या 'रामधाम' नावाच्या रिसॉर्टवर नाष्ट्यासाठी थांबलो... गेल्यावर्षीही या ठिकाणी आम्ही आलो होतो. त्यामुळे हे ठिकाण माहित होते... तेथे नाष्टा काही चांगला मिळाला नाही. तरी कसेबसे ते खाऊन आम्ही निघालो ते पेंच प्रकल्पाच्या दिशेने....

महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवर पेंच प्रकल्प आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र पार करून पेंचच्या दिशेने कूच करावे लागले. खरं तर मनसरपासून
ते
थेट महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उंचच्या उंच सागवान इतर झाडांची गर्दीच होती. त्यामुळे आम्हाला एकदम मस्त वाटत होते. थंड वारा वाहत होता.. आम्ही मग मराठी गाणी सुरू केली. त्यात आमच्या गप्पाही सुरू होत्याच...

साधारण साडेबारा एकच्या सुमारास आम्ही कर्माझरीला पोहचलो. थेट पेंच प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर पोहचलो. तेथे कळाले की, अडीच वाजता आत जाण्यास मिळेल. तसेच आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश फि भरावे लागेल. त्यासाठी आम्ही सुमारे अर्धा ते एक तास रांगेत उभे होतो. वन विभागाचे कर्मचारी असल्यामुळे ते त्यांचे काम अत्यंत सावकाश रितीने करीत होते. कसे तरी करून आम्ही प्रवेश शुल्क (एक हजार रुपये फक्त) भरले. त्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी जिप्सी ठरविली. तसेच मध्यप्रदेश टुरिझम बोर्डाचा गाईडही बुक केला. साधारण तीनच्या सुमारास आमचे रजिस्ट्रेशन झाले. (पेंच पहायला जायचे असेल तर वेळ वाचविण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणे सोईचे होईल, हे आम्हाला तिथे कळाले.)

सर्व सोपस्कर उरकून तीनच्या सुमारास आम्ही जिप्सीमध्ये स्वार झालो अन् सुरू झाली 'त्याला' म्हणजे वाघोबाला बघण्याची प्रतिक्षा... सकाळीच्या लोकांना वाघाने थेट समोर येऊन दर्शन दिल्याचे तेथील वन कर्मचाऱ्यांची सांगितले. त्यामुळे आम्हाही वाघ दिसणार अशी आशा लागून राहिली.

जिप्सीमध्ये बसून गाईडच्या मार्गदर्शनाखाली जिप्सीचालक हरिराम गाडी चालवत होता... घनदाट
झाडीतून जाणाऱ्या रस्त्यावरून आम्ही निघालो... सर्व प्रथम आम्हाला
दर्शन दिले ते सांबारने... रस्त्याच्या कडेला सांबार मस्त गवतात चरत उभे होते. त्याचे छायाचित्र काढल्यानंतर त्याने एक नजर आमच्याकडे टाकली अन् परत आपल्या कामात व्यस्त झाला.
तेथून काही अंतरावर पुढे गेलो तर रस्त्याच्या कडेला का ठिकाणी हरिरामने गाडी थांबविली खाली रस्त्यावर पहायला सांगितले. तेथे चक्क वाघाच्या पंजाचे ठसे उमटलेले होते. ते पाहून वाघच्या दर्शनाची उत्सुकता आणखीनच वाढली..


आम्ही
मग निघालो जंगल सफारीला.. रस्त्यात आम्हाला हरणांचा कळप, मोर, घुबड, माकडे यासह काही पक्ष्यांचे दर्शनही घडले. रंग बदलणारे झाड दिसले. तसेच वाघांच्या दातातील मासं खाणारे पक्षीही आम्हाला दिसले. मात्र अजूनही 'त्याची' काहीच चाहूल लागत नव्हती...

अन् थोड्याच वेळात हरणांच्या ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ पक्षांचाही आवाज ऐकू आला. हरिरामने लगेच गाडी बंद केली. गाईडने
शांत बसायला सांगितले. आम्हाला कळेच ना की काय झाले... त्याने सांगितले की वाघोबा जवळपास कुठेतरी असल्याचे संकेत पक्षी देत आहेत.... मग आम्ही चहू बाजूला पाहू लागलो... सगळीकडे एकदम शांतता पसरली... जंगलातील शांतता पहिल्यांदाच ऐकत असल्यामुळे एक वेगळा रोमांचकारी अनुभव घेत होतो.... काही क्षणांत आम्ही जेथे थांबलो तेथे आणखीनही काही लोकांच्या गाड्या आला... त्यांनाही वाघाची चाहूल लागली होती....

काही वेळ शांततेत गेली... मग थोड्या वेळाने संकेत येणेही थांबले... मग आम्ही पुढे निघालो... परत थो
ड्या वेळाने पुन्हा आवाज ऐकू येवू लागले. आता वाटले की, वाघ दिसणार... मात्र पुन्हा वाघोबाने आम्हाला हुलकावणी दिली.... तीनदा अशा प्रकारे संकेत मिळूनही आम्हाला वाघोबाचे दर्शन काही घडले नाही... सकाळी ज्या ठिकाणी वाघाने दर्शन दिले त्या रस्त्यावर दोनदा चक्कर मारूनही आमची निराशा झाली...


या दरम्यान गाईड म्हाला जंगलाची माहिती देत होता. हा प्रकल्प राबविण्यासाठी या परिसरातील सात गावे हलवावी लागली होती. ७५७ चौरस किलोमीटर पसरलेल्या या जंगलात सागवान, बेल, आवळा यासह १८९ प्रकारची वृक्षसंपत्ती आहे. या जंगलात एकूण ३३ वाघ, ४१ बिबटे, ३२५ प्रकारचे पक्षी २० हजाराहून अधिक हरणे असल्याची नोंद
हे. शासनाने जंगल आणखीन वाढण्यासाठी जाणीवपूर्वक सागवानाची झाडे लावली आहेत. त्यामुळे झाडांची गर्दी लगेच जाणवते.


थंड वाऱ्यात जंगलात फिरताना वेळ कसा निघून चालला होता हे कळलेच नाही... गर्द झाडीतून सूर्याची किरणे सुंदर दिसत होती... सूर्य हळू हळू मावळतीला आला होता... सायंकाळी साडेपाच वाजता प्रकल्प बंद होत असल्यामुळे हरिराम गाईडची परत निघायची घाई सुरू होती...

सव्वा पाचच्या सुमारास आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. तोपर्यंत थंड वारे मोठ्या प्रमाणात अंगा
ला झोंबू लागले होते. एकीकडे मनात जंगल सफारीचा आनंद होत होता तर दुसरीकडे वाघाचे दर्शन मिळाल्याची खंत वाटत होती. परतीच्या मार्गावर एका ठिकाणी गाडी बंद पडली. मनात म्हटले, गाडी सुरू होईपर्यंत वाघोबाने दर्शन तरी द्यावे. हरिरामने खटपट करून गाडी सुरू केली अन् परत एकदा आमची निराशा झाली.

परत येत असताना अचानक रस्त्याच्या कडेला आम्हाला एका कोल्ह्याने दर्शन दिले... हरण, मोर तर आमच्या स्वागतासाठी आल्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला दिसत होते.
साडेपाच -पावणे सहाच्या सुमारास आम्ही परत मुख्य गेटजवळ पोहचलो... तोपर्यंत अंधार पडला होता.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रकल्पाची माहिती देणारे एक केंद्र आहे. त्यातील चित्रमय माहिती काही दृष्य असणारे चित्रे पाहून मन प्रसन्न झाले. त्या आनंदात मी तेथील केंद्रातून दोन टी शर्टही खरेदी केले.

रामटेकची सफर

सायंकाळचे सहा वाजले होते. मात्र साडेआठ वाजल्याप्रमाणे अंधार पडला होता. तेथील वातावरण पाहून खरं तर तेथे मुक्काम करण्याची इच्छा झाली होती. परत आम्ही निघालो. रस्त्यात ठरविले की रामटेक या ठिकाणी जाऊयात.. तेथील कालिदास स्मारक पाहण्याचे गेल्या वर्षी राहिले होते. मग निघालो रामटेकच्या दिशेने...

अंधार पडलेला... टेकडीवर जाणारा वळणदार रस्ता... रस्त्यावर एकही वाहन नाही... फक्त आजूबाजूला दिसणारी झाडे अन् सुनसान रस्ता.... रात्री आठच्या सुमारास रामटेकवर पोहचलो... कालिदास स्मारकाजवळही अंधार गुडुप पसरला होता... गाडी स्मारकाजवळ थांबविली... आजूबाजूला चिटपाखरूही नव्हते... स्मारक परिसरातही अंधाराचेच साम्राज्य... सहज नजर आकाशाकडे वळविली... नभांगणातील ताऱ्यांचे दृष्य पाहतच राहिलो... अतिशय निरभ्र आकाशात चांदण्या चमकत होता.... अनेक वर्षानंतर असे आकाश दर्शन घडले होते. काही वेळ आकाशाकडे पाहतच उभा राहिलो... नंतर सहज आजूबाजूला पाहिले तर मी एकटाच उभा होतो.. माझे सहकारी इर्शाद, गजानन राजू केव्हाच स्मारकाच्या आतमध्ये गेले होते. मी एकटाच त्या अंधारात उभा होतो. सोबतीला होती भयाण शांतता... थोडे भय वाटले पण हा वेगळा अनुभव अनुभवायला मिळाल्याचे समाधानही वाटले.

मग मीही झपाट्याने स्मारकाच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये परिसरात सर्वत्र अंधार असल्यामुळे बघण्यासारखे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही चौघे परत गाडीकडे निघालो.... तेथून परत नागपूरच्या दिशेने आम्ही प्रयाण केले....

जाताना फक्त एकच हुरहुर लागली होती... एवढे करूनही वाघोबाचे दर्शन काही घडलेच नाही... आमच्यात सर्वात जास्त राजूला खेद वाटला... (त्याचे कारण वेगळे होते ही गोष्ट अलहिदा...)

वाटेत आम्ही एका धाब्यावर मस्त जेवण केले अन् पान खात रूमवर रात्री साडेअकराच्या सुमारास पोचलो. पुढच्या शनिवारी रविवारी कुठे जायचे याचे बेत रात्री रुमवर आखले. जंगल सफारीच्या आठवणीत निद्रादेवीच्या अधीन कधी झालो ते आम्हाला कळलेच नाही...( ता. . - पेंचला भेट देणाऱ्यांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास तिथे पोचावे. जेणेकरून जंगल सफारीचा जास्त वेळ आनंद घेता येईल वाघोबाचे दर्शन घडण्याचे चॅन्स जास्त असेल...)

7 comments:

Anonymous said...

mast re nandya...good

Devidas Deshpande said...

वाघमारेंना वाघ दिसला नाही, म्हणजे कमालच आहे. फेऱ्या मार वारंवार, दिसेल कदाचित.
यानिमित्ताने का होईना, पुन्हा लिहू लागलास. मस्त.

Anonymous said...

नंदू, खूप दिवसांनी तुझं लेखन वाचायला मिळालं...लिहित रहा.
प्रसाद नामजोशी

Nandkumar Waghmare said...

धन्यवाद मित्रांनो... तुमच्या प्रोत्साहनामुळे मला लिहिण्यासाठी ऊर्जा मिळेल...

Manish S Patel said...

Grate finally you start reading and writing ! keep it up......

Anonymous said...

Waghmare na ghabrun kadachit wagh baher ala nasel. Tula ghabarla asel. Athva waghmare n chi sankhya kami houn waghmare bachav abhiyan rabvave lagu naye mhanun to ala nasel.

Ashish Chandorkar

DHANVANTRI said...

Nice
Dr Somnath Salgar-9881287065