Sunday, July 1, 2007

hostel life


एक वर्षापूर्वी माझा लेख `सकाळ्मध्ये आला होता. त्या लेखाची ही प्रत...... तुम्हाला नक्कीच आवडेल.........
--------------
केवळ सोईसाठी "पॅरासाईट'

काय हो, तुम्ही "पॅरासाईट' हा शब्द कधी ऐकला आहे का? पुणे विद्यापीठात शिकलेल्या प्रत्येकाला हा शब्द माहीत असेल. आज राज्याच्या प्रशासनात, केंद्राच्या प्रशासनात मोठ्या पदावर राहिलेल्या अनेक जणांनी "पॅरासाईट' म्हणून पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलवर दिवस काढलेले आहेत. आता विद्यापीठाने हॉस्टेलवरील पॅरासाईटवर कारवाई केल्याने ते दिवस आठवले. तर मी "पॅरासाईट'विषयी सांगत होतो. (होस्टेलमध्ये मित्राच्या रूमवर "चोरी चोरी चुपके चुपके' राहणे म्हणजे पॅरासाईट) तेव्हा, म्हणजे 2001 पूर्वी विद्यापीठाच्या सहाही हॉस्टेलवर मोठ्या प्रमाणात "पॅरासाईट' होते. मीही त्यांच्यापैकीच एक. काही जणांनी तर सहा-सहा, आठ-आठ वर्षे या हॉस्टेलवर "पॅरासाईट' म्हणून दिवस काढलेले आहेत. बहुतेक वेळा ही मुले "एमपीएससी' किंवा "यूपीएससी' करणारी असतात. त्यामुळे या मुलांचे मार्गदर्शन नव्या मुलांना होत असे. काही जण अशा मुलांना आपल्या रूमवर जागा देत असत. रूमचा मालक असलेला विद्यार्थी कॉटवर झोपत असे, तर "पॅरासाईट' हा जमिनीवर अंथरूण टाकून. काही जण मात्र मूळ मालकाला खाली झोपवून आपण त्या रूमचे मालक असल्याप्रमाणे राहत असत, ही गोष्ट वेगळी! "टू सीटेड' रूममध्ये चार ते पाच जण, तर पाच जणांच्या खोलीत किमान दहा ते बारा जण राहत असत. विद्यापीठाच्या हॉस्टेलवर जेवढी मुले कायदेशीर प्रवेश घेऊन राहत होती तेवढीच, किंबहुना जास्तच "पॅरासाईट' म्हणून राहत होती. यातील बहुसंख्य मुले ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी व जयकर ग्रंथालयात बसणारी होती. त्यामुळे परीक्षांच्या काळात "जयकर'मध्ये जागा मिळविणे म्हणजे एक दिव्य असायचे. त्यासाठी सकाळी साडेसहा ते सातपासूनच रांग लावावी लागायची. यात "पॅरासाईट' मुलांचा पुढाकार जास्त होता. एक हेतू म्हणजे जागा मिळविणे आणि दुसरा म्हणजे सकाळी-सकाळी हॉस्टेलवर रेक्‍टरची "धाड' पडली तर आपण सापडले जाऊ नये. त्यामुळे ही मुले सकाळीच "जयकर'ला पळ काढायची. मात्र ती दुपारी काही वेळ आराम करण्यासाठी पुन्हा रूमवर येत असत. रेक्‍टरची धाड पडू नये, आपल्यामुळे ज्याच्या नावावर रूम आहे त्याला त्रास होऊ नये, यासाठी "पॅरासाईट्‌स' दक्ष असायचे. ज्या दिवशी "धाड' पडणार अशी कुणकुण लागायची, तेव्हा ते रूमवर रात्री उशिरा येत असत. कारण रेक्‍टर रात्री साडेअकरा ते दीड या वेळातच धाडी टाकत असत. त्यांचे वेळापत्रक काही विद्यार्थ्यांना पाठ झाले होते. त्यामुळे हे विद्यार्थी सायंकाळपासूनच इतरांना सावध करीत. तसेच एका हॉस्टेलवर धाड पडली की जवळच्या हॉस्टेलवरील मुले "गुल्ल' व्हायची. त्यामुळे बेसावध असलेलेच रेक्‍टरच्या हाती पडत. नवीन होतो तेव्हा एकदा सकाळी आठच्या सुमारास आंघोळीसाठी जात असतानाच सहा नंबर हॉस्टेलवर रेक्‍टरची धाड पडली. त्यामुळे सर्व "पॅरासाईट' बनियन व टॉवेलवर हॉस्टेलमागील झुडपात पळालो. ते दृश्‍य आठवले की अजूनही हसू आवरत नाही. असाच एक दुसरा प्रसंग. एम.ए.च्या दुसऱ्या वर्षाला असताना चार नंबरच्या हॉस्टेलवर राहत होतो. हिवाळ्यात एके दिवशी रात्री अडीचच्या सुमारास रेक्‍टरची धाड पडल्याची कुणकुण लागली. लागलीच आजूबाजूच्या रूममधील "पॅरासाईट'नी थेट गच्चीवर धाव घेतली. कडाक्‍याची थंडी पडलेली. गच्चीवर जाण्यासाठी खिडक्‍यांवरून जावे लागत असे. त्यामुळे प्रत्येकाची वर जाण्याची घाई. वर जाऊन त्या थंडीत उघड्या जमिनीवर झोपलो- जेणेकरून कोणाला दिसू नये. कडाक्‍याच्या थंडीत सुमारे दोन तास सर्वांनी गच्चीवर काढले. अनेकांनी अशा कित्येक रात्री तारे मोजण्यात घालविल्या. "पॅरासाईट' विद्यार्थी रात्री बाराशिवाय झोपत नसत. लवकर झोपले आणि रेक्‍टर आले तर काय घ्या? त्यामुळे रात्री अनेक जण अभ्यास करण्यात अथवा दंगामस्ती, गाणे ऐकणे अशा व्यापत दिसत. प्रत्येक हॉस्टेलवर एक तरी "हौशी' गायक किंवा वादक असे. त्यामुळे त्यांची कला ऐकत, त्यांची टिंगल करण्यात रात्र कशी सरत होती, ते कळतच नव्हते. 2001 नंतर आता वसतिगृहातील वातावरण "स्ट्रिक्‍ट' केले आहे. त्यामुळे "पॅरासाईट' कमी झाले आहेत. विद्यापीठात मुलांसाठी सहा व मुलींसाठी वेगळे हॉस्टेल आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहातही अनेक "पॅरासाईट' राहत असत. एक मात्र खरे, की "पॅरासाईट' हा त्याच्या मर्जीने "पॅरासाईट' होतो असे नाही. नोकरी, घरून येणारे मर्यादित पैसे, आदी प्रश्‍न असल्याने अनेकदा स्वतंत्र खोली घेऊन राहणे शक्‍य नसते. बरे विद्यार्थिदशाही संपलेली असल्याने हॉस्टेलवर प्रवेश मिळत नाही. अशा वेळी सोय लावायची म्हणून परिस्थितीला शरण जाणे, असाच काहीसा हा प्रकार असतो. नाहीतर असे "बांडगूळ' म्हणून जगणे कोणाला आवडते?

- नंदकुमार वाघमारे

No comments: